छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती


CSMSS Campus
26 Jun 2026
आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था CSMSS येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीत मुळे, सचिव श्री. पद्माकरकाका मुळे आणि विश्वस्त श्री. समीर मुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले . शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जाती अंताचा लढा यांसह कृषी-सिंचन, औद्योगिक क्षेत्रातील विकासात्मक दृष्टी त्यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजही दिशादर्शक आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट प्रथा, रुढी परंपरांना विरोध करून बंदी घातली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात संस्थेचे अध्यक्ष श्री. रणजीत मुळे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. श्री. पद्माकरकाका मुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण, सामाजिक न्याय, समता आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्यामुळे शाहू महाराजांचे नाव भारतीय इतिहासात आदराने घेतले जाते. शाहू महाराजांनी शिक्षण सर्वांसाठी खुले व्हावे, यासाठी अनेक धोरणे राबवली. समाजातील वंचित घटकांना शिक्षण व नोकरीत संधी मिळावी, यासाठी त्यांनी आरक्षणाचा विचार प्रत्यक्षात आणला. सामाजिक समानता, स्त्री शिक्षण आणि लोककल्याणकारी निर्णयांमुळे त्यांना ‘राजर्षी’ म्हणून ओळखले जाते. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. लता काळे, आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य डॉ. जयश्री देशमुख, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ. जी. बी. डोंगरे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ. एस. आर. डिकले, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक श्री.अनिल तायडे, जनसंपर्क अधिकारी श्री. संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य आणि विभागप्रमुख आदी उपस्थित होते.